रात्री धार्मिक स्थळांची तपासणी करण्याची पोलिसांना सक्‍ती!

Foto

औरंगाबाद : शहरातील आविष्कार कॉलनी भागातील शिवमंदिरात झालेल्या विटंबनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद यांनी शहरातील सर्व पोलिस ठाणेप्रमुख व अधिकार्‍यांना रात्री आपापल्या हद्दीतील धार्मिकस्थळे तपासून लाईव्ह लोकेशनची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.23 मे रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये चार वेळेस खासदार राहिलेले शिवसेनेचे मातब्बर नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव करीत एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील निवडून आले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पडली. मात्र, निकालाच्या दुसर्‍या दिवशीच शुक्रवारी सकाळी काही समाजकंटकांनी सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या हेतूने  आविष्कार कॉलनी भागातील मंदिरात विटंबना केली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊन शहराची शांतता भंग होऊ नये यासाठी पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मध्यरात्री ते पहाटे सात वाजेपर्यंत धार्मिक स्थळांवर प्रत्यक्ष जाऊन तपासणी करण्याचे आदेश संबंधित पोलिस अधिकार्‍यांना दिले आहेत. त्याअंतर्गत वाहतूक, गुन्हे, पोलिस ठाणे स्तरावर तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीतील 17 पोलिस ठाण्यांतील गुडमॉर्निंग पथके आणि त्याव्यतिरिक्‍त एक पोलिस अधिकार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय, औरंगाबाद शहर, सिडको, वाळूज, छावणी अशा सर्व वाहतूक विभागाच्या कर्मचार्‍यांना तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच गुन्हे शाखेचे पथकही नेमण्यात आले आहे.

लोकेशन सेंड करणे अनिवार्य
रात्री गस्तीदरम्यान मंदिर, मशीद, गुरुद्वारा, बुद्ध विहार, अशा विविध धार्मिक स्थळांना हे विशेष पथक सकाळी 7 वाजेपर्यंत भेट देणार आहे. भेट देणार्‍या पोलिस अधिकार्‍यांनी तयार करण्यात आलेल्या एका विशेष व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर भेट देत असलेल्या धार्मिक स्थळावरून लाइव्ह लोकेशन सेंड करावे लागणार आहे. पोलिस आयुक्‍तांच्या या आदेशामुळे कामचुकार पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे.